Sunday, June 13, 2010

माझं गोवा दर्शन

आयुष्यात प्रथमच गोव्याला गेलो होतो आणि तेही फक्त दोन दिवसांसाठी. तरीही जे पाहिले आणि अनुभवले ते इथे शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न करतो. काही चुकलं तर गोड मानून घ्या..


गोव्याला जाण्याचे कारण म्हणजे शैलेंद्र. हा माझा ऑफिसमधील एक छान सहकारी आणि रुममेट. शैलेंद्र मुळचा गोवेकर आणि त्याला गोव्याबद्दल काही वाईट बोललेलं आवडत नाही. आता बरीच मंडळी म्हणजे जी काही नेहमीच भेटतात त्यांचे म्हणणे एकच "गोवा म्हणजे फेणी आणि धुंद समुद्रकिनारा". त्यातही फेणीचा उल्लेख जास्त आणि घरात तर नेहमीच धाक की गोव्याला जायचं नाही.


हे सर्व उल्लेख केले की शैलेंद्र मला सारखा म्हणणार की हे सर्व चुकीचं आहे. मुळात गोवा निसर्गसंपन्न आहे. माझ्याबरोबर एकदा गोव्याला ये आणि मग बोल. मग मीही अनुमोदन दिलं आणि म्हणालो मला तरी इतरांच म्हणण योग्य वाटत नाही आणि तुझं बोलण खर आहे. एक काम करू येत्या विकांताला जाऊ तुझ्याच घरीगोव्याला.


ठरल्याप्रमाणे शुक्रवारची रात्रीच आम्ही दोघे पुण्याहून निघालो. शनिवारी सकाळी ७:०० वाजता मडगांवला पोचलो. तिथून शैलेंद्रच्या घरी गेलो. तिथे जाताना रस्त्यात माडांची बने आणि हिरवाई बघून बारा तासांचा प्रवासाचा शीण गेला. गेल्या गेल्या प्रथम आन्हिक उरकलं. त्यानंतर नाश्ता म्हणून चक्क ७ डोसे आणि ३ वाट्या चटणीचा फन्ना उडवला. नंतर दुपारी १:०० च्या सुमारास आम्ही बाहेर पडलो आणि थेट पोचलो जुन्या गोव्यात. तिथे काही चर्च आहेत.. त्यांची नावे काही आठवत नाहीत बुवा. पण भव्य वास्तू आहेत.


जुना गोवा बघून झाल्यावर आम्ही पणजीला निघालो. पणजीमध्ये मिरामारचा समुद्रकिनारा जो एक शांत समुद्रकिनारा म्हणून ओळखला जातो.. तिथे जाऊन थोडा वेळ घालवला.. गोव्यात मला असं दिसलं की लोक जगण्याचा आनंद घेतात. गोवेकरांची स्वागत करण्याची पद्धत आणि पाहुण्याशी वागण्याची पद्धत तर मला आवडली. सुशेगात जीवन जगण म्हणजे काय ते अनुभवावे तर गोव्यातच.


गोवा निसर्गसंपन्न आहेच आणि तेथील नियमसुद्धा त्याच्या अनुरूप आहेत. उदाहरण द्यायचं झाल्यास जर का तुम्हाला गोव्यात घर बांधायचं असेल तर घरासभोवती कमीत कमी ४ नारळाची झाडं हवीत नाही तर घर बांधायला परवानगी मिळत नाही. शनिवारचा एक दिवस जास्त काही पाहता आलं नाही. पण एक चांगला अनुभव मिळाला आणि गोवा म्हणजे नुसती फेणी नाही तर आणखी खूप काही आहे. रात्री रमत गमत घरी गेलो. फक्त सोलकढी आणि भात एवढंच चापून मस्त झोपी गेलो.


दुसरा दिवस रविवार जो सर्वांचा विश्रांतीचा दिवस. ह्या दिवशी जरा आणखी काही नवीन गोष्टी बघण्याचा बेत केला.. पण जास्त काही करता आलं नाही. सकाळी फक्त रामनाथी मंदिर पाहता आले.. इच्छा होती की मंगेशी मंदीर आणि दुधसागर धबधबा पाहावा म्हणून.. पण वेळ नाही.. त्याला मी तरी काय करणार. दोन दिवस सुपरफास्ट गोवा दर्शन करून संध्याकाळी ६:०० वाजता परतीची वाट धरली पुन्हा पुणे..




अवांतर: सध्या मनात एकच प्लान घोळतोय.. तो म्हणजे ट्रेकला जाण्याचा रोहनसोबत.. आणि म्हणूनच ही छोटेखानी पोस्ट टाकतोय..