Monday, August 9, 2010

गोष्ट एका पिंगूची

पिंगू.... गुगलशोध घेतला तर एक कार्टून... आणि बच्चे कंपनीचा आवडता...

पण माझ्यासाठी मात्र ह्या "पिंगू" ला अतिशय महत्व आहे. सांगतो का? त्याची सुरुवात झाली ती माझ्या सातव्या इयत्तेपासून... त्यामागचं कारण जरा मजेशीर आहे.
कारण असं की चित्रकला ह्या विषयात आम्ही एक क्रमांकाचे "ढ".. आता सांगायला का लाजू की मी चित्रकलेत ढ होतो म्हणून..तर अस्मादिकांना चित्रकलेत पिंगूनेच वाचवलं..
कारण चित्रकलेच्या कुठल्याही पेपरला मी फक्त आणि फक्त "पिंगू" च रेखाटत असे... आणि ह्यावरून आमचा उद्धारही केला गेला.. तरीही माझं पिंगूप्रेम तसूभरही कमी झाल नाही.. उलट वाढलं.
कारण चित्रकलेत काही इतर काढता येत नसल्याने एकमेव पिंगूचे चित्र काढणे आणि चित्रकलेच्या सरांनी मला बदडणे हा एक कॉमन प्रकार चालू होता जवळजवळ २ वर्षे..
पण मला काही कल्पना नव्हती की हाच पिंगू पुढे आयुष्यात येईल म्हणून..असो तेव्हा तरी निदान पिंगूच्या चित्रामुळे कसाबसा का होईना चित्रकला विषयात आपली नाव किनारयाला लागली..


त्यानंतर दहावी आणि पदविका शिक्षण पूर्ण केले आणि मध्यंतरात पिंगूची आठवण पुसट झाली होती.. त्यानंतर प्रपंचासाठी नोकरी शोधणे सुरु झाले आणि मनाजोगते काही मिळेचना.. तरी जे मिळेल ते स्वीकारून वाटचाल करत राहिलो..तेव्हा ३-४ वर्षानंतर, एका मित्राने लिनक्सची ओळख करून दिली.. तेव्हाही माहित नव्हत की तेथे पिंगूची पण वट आहे...नंतर लिनक्स शिकलो सुद्धा... आणि शिकल्यानंतर जेव्हा लिनक्स बद्दल जरा मोठ्या गुरूंकडून माहिती मिळवली.. तेव्हा कळले की टक्स उर्फ पिंगू (आपला पिंगू) लिनक्सच चिन्ह आहे... आणि त्याच लिनक्समध्ये मी आज काम करतो आहे..म्हणजे आता सुद्धा मला पिंगूने माझ्यासारख्या बुडत्याला काडीचा नाही तर भक्कम आधार दिला. ज्याने मला बराच सावरलं.

तर असा हा पिंगू... माझ्या आयुष्यात एक महत्वाचा भाग म्हणून गणला आहे...