Saturday, March 5, 2011

मिशन हस्ताक्षर

सांगायच कारण काय तर आज काल हाताने केलेले लिखाण खूपच वाईट यायला लागलय. काय कारण असेल बर याचं. जरा धांडोळा घेतला तर लगेच कारण उमजले.  काय असेल ते तर गेल्या दोन वर्षात मी पेन आणि पेन्सिल वापरून काही लिहिलेच नाही. तेव्हा जरा भूतकाळात डोकावण्याची इच्छा झाली.

शाळेतील ते दिवस आठवले. पाचवी-सहावीला असताना माझे अक्षर म्हणजे शाळेत असताना एक अगम्य होतं. शिक्षक म्हणायचे कार्ट्या काय ह्या कोंबडीच्या नख्या काढल्यात. त्यामुळे कधी कधी गृहपाठाची वही
डोक्यात पडायची. हा नित्यनेम सातवीत जाईपावेतो असाच होता. सातवीला एका भल्या शिक्षकांनी मला अक्षर सुधारण्यावर भर दिला आणि त्या गुरुंच्या कृपेने माझे अक्षर अगदी दृष्ट लागण्याइतके सुरेख झाले.

तेव्हापासून ते शिक्षण पुर्ण होईपर्यंत माझे अक्षर अतिशय उत्तम राहिले. पण काही म्हणजे तीन-चार वर्षांपूर्वी जेव्हा आयटी क्षेत्रात प्रवेश केला आणि कळफलक बडवायला सुरुवात केली. तेव्हापासून माझे अक्षर लेखन बिघडायला लागले. सुरुवातीला काही लक्ष दिले नाही. पण आता वाटतयं की काहीतरी गमावतोय.

सहज हातात पेन घेउन लिहण्याचा जरी प्रयत्न केला, तरी मी काही शब्द नीट लिहू शकत नाही. म्हणजे काय तर एकंदरीत मी माझी लिहण्याची क्षमताच गमावून बसलोय. मग पुन्हा एकदा अक्षरप्रपंच सुरु करावासा वाटला आणि त्याला सुरुवात करतोय, पुन्हा तीच ती जुनी शाईची लेखणी घेउन..

मग तुम्ही केव्हा सुरु करताय. लिखाण करायला.... शाईची लेखणी घेउन..