Wednesday, October 27, 2010

एडसचा जीवघेणा पाश

ही एक सत्य घटना आहे. मी स्वत: अनुभवलेली.

ही कथा आहे दहा वर्षापूर्वीची. जेव्हा मला मूळव्याधीच्या उपचारासाठी एका इस्पितळात भरती करण्यात आले होते. त्या इस्पितळात एक मोठे दालन होते जिथे बहुतेक सर्व रुग्ण दाखल केले जात आणि मी पण तिथेच होतो.

मी तिथे डेरेदाखल झाल्यानंतर रोज एक वेगळा रुग्ण म्हणून मला जी वागणूक मिळाली ती खूपच चांगली होती. कारण काय तर मी एक वेगळा रुग्ण आणि विद्यार्थ्यासाठी एक अभ्यासाचा भाग होतो. म्हणूनच मला चांगली काय ती वागणूक मिळत होती आणि हे लक्षात यायला मला काही वेळ लागला नाही.

मी तिथे भरती झाल्यावर तिसरया दिवशी एक आणखी रुग्ण तिथे भरती झाला आणि त्या रुग्णाला सर्वांपेक्षा वेगळ ठेवण्यात आलं. त्या दिवशी मी ह्याच कारण कुणाला विचारलं नाही. पण निरीक्षण चालू ठेवलं आणि माझ्या ध्यानात आलं की त्या रुग्णाकडे कोणी लक्ष देत नाहीये.

मग मी सहज म्हणून एका इंटर्नशिप करणारया डॉक्टरला विचारून बघितलं आणि मला कळलं की तो रुग्ण एडसचा रुग्ण आहे. त्याच वय काय असेल. फक्त २४ आणि थोडी आणखी माहिती काढल्यावर कळले की त्याच लग्न झाले असून त्याला एक लहान मुलगी पण आहे. त्याला बघायला एव्हाना कुणी आलं नव्हत.

पहिल्या दिवशी त्याला उपहारगृहवाल्याने जेवण आणून दिले आणि जेव्हा तो एडसचा रुग्ण आहे हे कळले तेव्हा उपहारगृहवाला स्वत:च भीतीने आजारी पडला. त्यानंतर मात्र त्या रुग्णाची आबाळ होऊ लागली. कारण एव्हाना मला तपासताना डॉक्टर आणि इतर मंडळी उत्साहात यायची. पण त्यापैकी एकजण सुद्धा त्या रुग्णाकडे फिरकला नाही. मला हे बघून कसतरीच वाटलं आणि त्याक्षणी मला टीवी वर लागणारी एडसची जाहिरात आठवली.

"एडस छुने से नाही फैलता"- इति शबाना आझमी आणि इतर काही नट मंडळी.

एरवी नटनट्यांचे अंधानुकरण करताना आपल्याला काहीच वाटत नाही. पण रुग्णाची शुश्रुषा करायचं पुण्यकर्म करायला कोणी तयार नव्हत. पण फक्त प्रश्न पडून काय उपयोग. म्हणून मी जाऊन त्या रुग्णाची शुश्रुषा करण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय किती जड आहे ते नंतर कळलं.

त्यानंतर मला डॉक्टर येऊन म्हणाले की तू तिकडे का गेलास? मी उत्तर दिले की तुम्ही पण जायला घाबरता का नाही हे सांगा अगोदर. आणि हे खर होत. डॉक्टर सुद्धा मनातून भ्यायले होते. प्रश्न मला पडला होता की ज्याने रुग्णाची व्यवस्था बघायची तोच असा पळपुटा आणि भेकड निघाला तर त्या रुग्णाने काय करायचे. त्यावेळेस तर जवळ जवळ त्या दालनातील प्रत्येकालाच अनामिक दहशत बसली होती. फक्त मी सोडून.

सलग तीन दिवस त्या रुग्णाची मी शक्य तितकी शुश्रुषा करत होतो. चौथ्या दिवशी त्याची बायको आणि लहान मुलगी दोघेही इस्पितळात आले.. त्याच्या बायकोकडून मला त्याचा इतिहास समजला. तो असा, रुग्ण मुलाचा पश्चिम बंगाल मधील सुवर्ण कारागीर होता आणि भुलेश्वरला दागिने घडवायचा कारखान्यात कामाला होता. तेव्हा मला कळले की रोगाचं मूळ कुठे आहे. त्या ठिकाणी वाईट संगतीमध्ये त्याला वेश्यागमनाची सवय लागली आणि केव्हा ह्या रोगाचा विळखा त्याला पडला हे त्यालासुद्धा उमजले नाही. त्याच काळात त्याचं लग्न झाले आणि एक गोड मुलगी सुद्धा झाली.

पण जेव्हा त्याच्या नातेवाईकांना हे कळलं की ह्याला जीवघेणा एडस झाला आहे. तेव्हा सर्वानीच साथ सोडली. साथीला होते तरी कोण. तर फक्त बायको आणि एक लहान मुलगी. इथे इस्पितळात त्या दोघींचीही एच आय व्ही टेस्ट केली गेली आणि ती टेस्टसुद्धा पोझीटीव निघाली. त्याचा बाहेरख्यालीपणा त्या दोन्ही निष्पाप जीवांनाही नडला होता.

इथे काय दोष होता त्या दोघींचा.. काहीच नाही. मग त्याने केलेल्या दुष्कृत्यांची शिक्षा त्या निष्पाप मायलेकीना का भोगावी लागणार होती? इथे हा प्रश्न मलाही पडला होता. पण ह्याच उत्तर मला कधी मिळणार नव्हतंच.

ही ब्लॉग पोस्ट "दीपज्योती" या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली आहे.

2 comments:

भानस said...

ही एक अतिशय विदारक सत्याची अव्याहत सुरू असलेली साखळी आहे. जिचा अंत आता कधीच शक्य नाही. जो जाणूनबुजून खाईत उडी घेतो तो स्वत:च जबाबदार पण या अश्या निष्पाप बळी जाणार्‍यांचे काय? केवळ प्राक्तन म्हणून भोग भोगत राहायचे... तेही चुपचाप. :(

मांडणी आवडली.

Let's Rock said...

khup chhan lihile aahe!